कोरोनाचा कहर / अमेरिकेच्या निर्बंधामुळे निष्पाप लोकांचे मृत्यू : इराण

तेहरान / वॉशिंग्टन /लंडन - युरोपीय देशांनंतर इराणमध्ये कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक वेगाने होत आहे. दुसरीकडे इराणने अमेरिकेवर नवा आरोप केला. अमेरिकेेच्या निर्बंधामुळेच विषाणूविरोधातील लढाईत खूप अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे विषाणूबाधेतून होणाऱ्या निष्पाप लोकांच्या मृत्यूला अमेरिका कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रपती हसन रुहानी यांनी केला आहे. परराष्ट्रमंत्री जवाद जरीफ यांनी यासंदर्भात रविवारी माहिती दिली. रुहानी यांच्या पत्राचा उल्लेख त्यांनी केला. अमेरिकेच्या निर्बंधामुळे त्रास वाढला आहे, असे रुहानी यांनी म्हटले आहे. विषाणू भूगोल किंवा राजकारण या दोन्ही गोष्टी मानणारे नसतात, असे जरीफ यांनी इराणची भूमिका मांडताना स्पष्ट केले. दरम्यान, इराणमध्ये १४ हजारांवर लोकांना संसर्ग झाला आहे, तर ७२५ जणांचा विषाणूबाधेने मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे रविवारपर्यंत जगभरात संसर्ग झालेल्याची संख्या १ लाख ६२ हजार ५८८ झाली होती. ६ हजार ६९ मृत्युमुखी पडले. ७५ हजार ९७५ लोक उपचारानंतर बरे झाले.


इटलीनंतर स्पेननेही लॉकडाऊन केले जाहीर


इटलीनंतर आता स्पेनमध्येही आणीबाणी व लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. सरकारने केवळ वैद्यकीय व खाद्यपदार्थांच्या गरजेसाठी घरातून बाहेर जाण्याची परवानगी दिली आहे. पंतप्रधान पेड्रो सांचेज यांची पत्नी बेगोना गोमेज यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. युरोपमध्ये सुमारे १० कोटी लोक घरांतच कैद आहेत. स्पेनमध्ये १९३ मृत्यू, तर इटलीत १४०० लोकांचा मृत्यू झाला आहे.


 


अमेरिकेत स्क्रीनिंग विलंबाने, ट्रम्प यांची चाचणी निगेटिव्ह


अमेरिकीच्या विमानतळावर प्रचंड गर्दी झाली आहे. न्यूयॉर्क व डलास विमानतळाहून प्रवाशांनी ट्विट करून लांबच लांब रांगेची छायाचित्रे शेअर केली आहेत. काही लोक म्हणाले, स्क्रीनिंगच्या या विलंबाने ते खोळंबले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना तपासणी झाली. ती निगेटिव्ह आली आहे. ब्राझील राष्ट्रपतींच्या सचिवांची भेट घेतल्यामुळे चाचणी घेण्यात आली.


 


ब्रिटन : सत्तरीतील वेगळे , महाराणींनी महाल सोडला


कोरोनाचा धोका वयस्करांना जास्त आहे हे लक्षात घेऊन ब्रिटनने आगामी काही आठवड्यांत ७० वर्षांहून जास्तच्या लोकांना घरातच किंवा स्वतंत्र ठेवण्याचे ठरवले आहे. ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हेनकॉक म्हणाले, अशा लोकांना घरातच सुविधा दिली जाणार आहे. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय व प्रिन्स फिलिप यांना बर्मिंगहम राजवाड्यातून विंडसर कॅसलमध्ये नेण्यात आले.


> व्हॅटिकनमध्ये ईस्टरनिमित्त होणाऱ्या पोप यांच्या कार्यक्रमात सामान्यांच्या सहभागाला मनाई करण्यात आली आहे.


> इस्रायलमध्ये नेतन्याहूंचा खटला पुढे ढकलला. अल सेल्वाडोर व कझाकिस्तानमध्ये आणीबाणी जाहीर.


> पाकिस्तानात पीडितांची संख्या ३८ झाली. सर्व शिक्षण संस्थांना ३० मेपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे.


> दहशतवादी संघटना आयएसलाही धास्ती, दहशतवाद्यांना अलर्ट, युरोपीय देशात कारवाया थांबवल्या.


कोरोनापेक्षा ५२ पट जास्त मृत्यू टीबीमुळे झाले


जगात संसर्गाची आेळख पटल्यानंतर सर्वाधिक मृत्यू टीबी व एचआयव्ही, एड्समुळे झाले आहेत. कोरोनापेक्षा ५२ टक्के जास्त टीबीने, तर २६ टक्के जास्त एचआयव्ही, एड्सने झाले होते.