दिव्य मराठी विशेष / डिप्रेशन, चिंताक्रांत महिलांच्या मुलांमध्ये न्यूनगंड, इतरांना मदत न करण्याची येऊ शकते भावना

न्यूयॉर्क - भलेही ती सांगत नसेल. एवढेच नव्हे तर ती आपली चिंतादेखील दाखवत नसावी. परंतु, माझी आई माझ्या चुकांमुळे दु:खी व निराश आहे. आपल्या आईच्या मानसिक स्थितीबद्दल असा विचार करणारी मुले स्वत:च डिप्रेशनचे शिकार ठरू शकतात. एवढेच नव्हे तर इतरांना मदत न करणे, अपयश आणि स्वत:ला इतरांपेक्षा कमी लेखण्याची भावनाही निर्माण होऊ शकते, असा दावा न्यूयॉर्क येथील सदर्न मेथोडिस्ट विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे.


हे संशोधन फॅमिली सायकॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. या प्रकल्पातील प्रमुख व एसएमयूमध्ये मानसशास्त्राच्या प्रोफेसर डॉ. क्रिस्टिना कोरोस म्हणाल्या, आईच्या चिंतेसाठी स्वत:ला दोषी ठरवतात व नकारात्मक विचाराच्या दिशेने वाटचाल करत असतात. अशा मन:स्थितीत असणाऱ्या मुलांना सकारात्मक अशा उपचारांतून लाभ होऊ शकतो. परंतु, डिप्रेशनच्या उच्च पातळीवरील मातांना आपल्या मुलांच्या बाबतीत भविष्यात डिप्रेशनच्या समस्येला तोंड द्यावे लागू शकते. मातांना आपल्या मुलांमध्ये निराशा व घबराट अशी लक्षणे दिसून आली का, अशी विचारणाही पाहणीतून करण्यात आली होती. बहुतांश महिलांनी त्याचे होकारार्थी उत्तर दिले. या प्रकल्पात चार वर्गीकरणांद्वारे मुलांचीही पाहणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.


डॉ. कोरोस म्हणाल्या, आईच्या संकेतांना लक्षात घेऊन मुलांनी व्यक्तिगत पातळीवर जबाबदारपणा अनुभवला तर ते आपल्या आईला अशा स्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू शकतात. भलेही हे प्रयत्न निश्चित अशा पद्धतीने केलेले नसतील तरीही चालतील. परंतु, दुसरीकडे असहकार्य, अपयश व न्यूनगंडाची भावना मात्र त्यांच्यात बळावू शकते, अशी भीती संशोधकांनी व्यक्त केली.